
लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली जात आहे. अशातच गुरुवारी शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईवेळी एक गावठी पिस्तूल आणि जवळपास 8 लाखांचे 78 ग्रॅम मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली, तर एक जण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मुंबई आणि पुणे भागातून लातुरात ड्रग्जची विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी एका घरातून गणेश अर्जुन शेंडगे (वय – 26, रा. एलआयसी कॉलनी, लातूर), रणजित तुकामार जाधव (वय – 24, रा. दहिसह, केकतीपाडा, गुणुबुवा कंपाऊंड, गोदावरी राणीचाळ, दहीसरपूर्व, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले, तर त्यांचा एक साथीदार फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून 78.78 ग्रॅम वजनाते 3 लाख 93 हजार किंमतीचे अमली पदार्थ, गुन्ह्यात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम, गावठी पिस्तूल असा 9 लाख 99 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी तिघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आलेली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासबे , नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू नीटुरे, सचिन मुंडे यांनी केली आहे.