देशभरातील घडामोडी

सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांची मंजुरी

मैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सिद्धरामय्यांच्या विरोधात खटला चालवला जाणार आहे. आरटीआय कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांच्याद्वारे जी तक्रार दाखल केली गेली त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

हरियाणात जेजेपीच्या चार आमदारांनी पक्ष सोडला

हरियाणात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच 24 तासात अजय सिंह चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाच्या चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. माजी कामगार मंत्री अनुप धनक यांच्या राजीनाम्यानंतर, शनिवारी आणखी 3 आमदारांनी पक्ष सोडला. यामध्ये रामकरण काला, ईश्वर सिंह आणि देवेंद्र बबली या आमदारांचा समावेश आहे. रामकरण, ईश्वर आणि देवेंद्र काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. अनूप झनक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारची प्रमुख उपलब्धी समजला जाणारा सुलतानगंज अगवानी गंगा पुलाच्या पिलर 9 चा सुपर स्ट्रक्चर कोसळला. गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने ही घटना घडली आहे. खांब क्रमांक 9 आणि 10 मधील स्लॅबच्या भागासाठी बांधलेली रचना नदीत पडली. या पुलाचा सुपर स्ट्रक्चर कोसळण्याची ही तिसरी वेळ आहे. सुपर स्ट्रक्चर कोसळल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. बिहारमध्ये गेल्या 2 वर्षांत 21 पूल कोसळले आहेत. त्यामध्ये 15 हून अधिक लहान-जुने पूल आहेत.