Latur News: दीड वर्षाच्या मुलींची आईनेच केली निर्घृण हत्या

नवरा लवकर घरी आला नाही म्हणून थेट दिड वर्षाच्या मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. माता न तू वैरीणी याचा प्रत्यय आला. लातूर शहरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

फिर्यादी विक्रम जगन्नाथ चौगुले, वय ३४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. हासेगाव (सी), ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. श्यामनगर, मांजरा गेट समोर, ता. जि. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी आश्विणी विक्रम चौगुले, वय ३० वर्षे, रा. हासेगाव( सी, )ता. कळंब, जि. धाराशिव हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये दिनांक १९/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १८/०१/२०२६ रोजी आपल्या पतीस फोन करून “कामावरून घरी कधी येणार” अशी विचारणा केली होती. पती घरी न आल्याने रागाच्या व मानसिक अस्थैर्याच्या भरात दिनांक १९/०१/२०२६ रोजी पहाटे सुमारे ०५.०० ते सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान श्यामनगर, मांजरा गेट समोर, लातूर येथील राहत्या घरी आपल्या अल्पवयीन मुलगी नंदिनी विक्रम चौगुले, वय १.५ वर्षे हिच्यावर घरातील चाकूने अंगावर विविध ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान बालिका नंदिनी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला तसेच मृतदेहावर इनक्वेस्ट पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आश्विनी विक्रम चौगुले हिला त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली . गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, पोलीस अमलदार जाधव, तुरे, कलमुकले यांनी पार पाडली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत असून आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.