
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा वायदा खोके सरकारने दिला होता. मात्र बोलघेवड्या सरकारचे आश्वासन गाजराची पुंगीच ठरली आहे. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी लातूरमधील दोन शेतकऱ्यांनी मानेवर नांगर टाकून मंत्रालयाच्या दिशेने कूच केली आहे. लातूर ते मुंबई 500 किमी पदयात्रा करत निघालेला हा बळीराजा भिवंडीत दाखल झाला असून लवकरच विधान भवनावर धडकणार आहे. फडणवीस सांगा.. सातबारा कोरा करणार कधी? आता घोषणा बस्स झाल्या. बळीराजाला न्याय देणार कधी? असा रोकडा सवालच ते सरकारला विचारणार आहेत.
बैलजोडी विकत घ्यायला पैसे नसल्याने नांगराला स्वतःला जुंपून अहमदपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी शेतीची मशागत करत असल्याचे छायाचित्र दैनिक ‘सामना’मध्ये झळकले होते. यानंतर सरकारची अक्षरशः बेअबू झाली आणि कृषीमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ या वृद्ध शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अशीच भयंकर अवस्था राज्यातील अन्य शेतकऱ्यांची असून कर्जाच्या जोखडाखाली दबलेला बळीराजा रोजच आत्महत्या करत आहे, परंतु सरकार ढिम्मच आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या याच तालुक्यातील धानोरा बुद्रुक या गावातील सहदेव होनाळे हे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्याबरोबर चाकूर तालुक्यातील झरी खुर्द येथील शेतकरी मित्र गणेश सूर्यवंशी हेदेखील असून साडेचारशे किमीचे पायी अंतर कापून हे दोघेजण भिवंडी मुक्कामी दाखल झाले आहेत.
जातीजातीत भांडणं लावून राजकीय पोळी भाजू नका!
भिवंडी मुक्कामी थांबलेल्या या दोन्ही शेतकऱ्यांच्या पायाला अक्षरशः फोड आले आहेत. मात्र स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून मंत्रालयावर घडकण्यास निघालेल्या या शेतकऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सहदेव होनाळे म्हणाले, ‘माझ्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. ते मी फेडेन, पण राज्यातील हजारो शेतकरी मायबाप सरकार सातबारा कोरा करेल या आशेवर आहेत. केवळ जातीजातीत भांडणं लावून राजकीय पोळी भाजू नका. शेतकऱ्यांच्या व्यथाही कधीतरी समजून घ्या’ अशा शब्दात त्यांनी फडणवीस सरकारला फटकारले आहे. संपूर्ण कर्जमाफीचे सरकारने दिलेले आश्वासन तत्काळ पूर्ण करावे अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.