लातूरमध्ये ठिकठिकाणी झळकतायत ‘भाड्याने देणे आहे’चे फलक, कारण माहिती आहे का ?

4872

शिक्षणातील लातूर पॅटर्नमुळे लातूर शहरात शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी दाखल होत असत. मात्र सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ई-लर्निंग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. लातूर शहर मात्र सध्या रिकामे झालेले आहे. विद्यार्थी, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उभी राहिलेली वसतीगृहे, भाड्याने दिल्या जाणाऱ्या खोल्या, शिवणीचे हॉल आणि शहरातील दुकाने मोठ्या संख्येने रिकामी झालेली असून सर्वत्र भाड्याने देणे आहे असे फलक लावलेले दिसून येत आहेत.

शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे लातूरात शिक्षणासाठी येण्याचे राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढलेले होते. शहरातील गल्ली बोळात खानावळी, वसतीगृहे, हॉटेल, विविध खाद्य पदार्थांची दुकाने, भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्यांमुळे अनेकांना सुगीचे दिवस आलेले होते. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. हे वर्ष असेच जाणार असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. सर्व व्यवहास सुरुळीत होण्यास सुरुवात होणार असली तरी पालकांची आपल्या मुलांना शाळा, महाविद्यालयांमध्ये पाठवण्याची तयारी नाही.

प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊनच शिकले पाहिजे असे काही नाही या मानसिकतेमध्ये पालक आणि विद्यार्थी दोघेही आलेले आहेत.  शासनाच्यावतीने सर्व वर्गांसाठी ई-लर्निंगची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. त्याचा खूपच लाभ होत असल्याचे पालक आणि विद्यार्थीही सांगत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना एकदा समजले नाही तर पुन्हा पुन्हा ते पाहण्याची व ऐकण्याची सुविधा असल्याने ही शिक्षण पध्दती आता सर्वांना चांगली वाटत आहे.

लातूर शहरातील अनेक दुकाने, खोल्या, शिकवणीसाठी तयार केलेले हॉल रिकामे झालेले आहेत. सध्या सर्वत्र भाड्याने देणे आहे असे फलक लावलेले आहेत. कोरोनामुळे या सगळ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला आहे. छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करणेही अवघड झालेले आहे. दुकानाचे भाडेही देण्याची क्षमता अनेकांमध्ये राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी आपला व्यवसायच बंद करून टाकलेला आहे. अनेकांनी आपली दुकाने बंद करून सर्व साहित्य आपल्या घरी नेलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या