फडणवीसांच्या नागपुरात कायदा व सुव्यवस्थेचा पोरखेळ; हिट ऍण्ड रन प्रकरणातील सहा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न

रविवारी मध्यरात्री दिघोरी टोल प्लाझा येथे मद्यधुंद अवस्थेत आलिशान कारने फुटपाथवर झोपलेल्या बगाडीया या आदिवासी कुटुंबातील 15 जणांना चिरडले होते. त्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाकडून सहा आरोपींच्या रक्तचाचणीचा अहवाल तत्काळ पोलिसांच्या हवाली करण्यात आला होता, अशी माहिती सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गझबिये यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे, मात्र हा अहवाल घटनेला 48 तास उलटूनही अद्याप प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे सुपूर्द करण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वत्र सरकार आणि पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

रक्त चाचणीचा अहवाल 48 तासांनंतरही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला नाही
नागपुरात नशेत असलेल्या चालकाने रविवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या 15 जणांना चिरडले होते. त्यातील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या घटनेला 48 तास उलटूनही पोलिसांनी आरोपी आणि त्यासोबत असलेल्या इतर पाच मित्रांच्या रक्तचाचणीचा अहवाल पुढील तपासासाठी प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरातच कायदा आणि सुव्यवस्थेचा पोरखेळ सुरू असून मिंधे सरकार हिट ऍण्ड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतेय का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

रक्ताचे नमुने खराब होण्याची भीती
आरोपींच्या रक्ताचे नमुने योग्य तापमानात ठेवले गेले नाहीत तर ते खराब होण्याची भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास आरोपींच्या सुटकेचे मार्ग प्रशस्त होऊ शकतात, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

दारूच्या नशेत दोन वेळा गाडी अंगावर मागेपुढे केली
सहा आरोपी तरुणांनी एकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जॉयराईड करण्याचे ठरवले. त्यांनी हुडकेश्वर धाब्यावर सर्वांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर आलिशान गाडी भरधाव हाकताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने फुटपाथवरील 15 जण गाडीखाली चिरडले गेले. यात चार मुलेही गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर मद्यधुंद कारचालकाने पुन्हा दोन वेळा गाडी झोपलेल्यांच्या अंगावर मागेपुढे केली आणि त्यानंतर पळ काढला. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.