‘लाडकी बहीण’ योजनेत तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत, पण त्यासाठी आम्हाला मते द्यावी लागतील, नसता खात्यातून दीड हजार रुपये काढून घेण्यात येतील… अशी धमकी देणारे आमदार रवी राणा यांची सगळीकडूनच खरडपट्टी काढण्यात येत आहे. मात्र लाडक्या बहिणीला दरडावणार्या बोलभांड भावाला दम देण्याऐवजी महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव करून त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. तर आमदार राणा यांनी नेहमीप्रमाणे आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा कांगावा केला.
अमरावती येथे काल ‘लाडकी बहीण’ योजनेचे प्रमाणपत्र वाटप करताना भाजपचे मित्र आमदार रवी राणा यांनी या योजनेतून तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. तेव्हा मते आम्हालाच मिळाली पाहिजेत. मते मिळाली नाही तर तीन हजारातील दीड हजार रुपये परत घेतले जातील, अशी धमकीच दिली होती. आमदार राणा यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात काहूर उठले. विरोधकांसह सत्ताधार्यांनीही त्यांना झोडपून काढले. लाडकी बहीण योजनेत देण्यात येणारा पैसा आमदार राणांच्या खिशातून जाणार आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही आमदार राणा यांच्या विधानावर नापसंती व्यक्त केली. मिंधे सरकारच्या आदिती तटकरे यांनीही ‘लोकप्रतिनिधींनी सांभाळून बोलावे’ असा सल्ला दिला.
सारवासारव करताना तोंडाला फेस…
आमदार रवी राणा यांनी दिलेल्या धमकीवर पांघरुण घालताना महायुतीच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला. मुख्यमंत्री मिंधे यांनी लोकप्रतिनिधींनी जपून बोलावे, असे म्हटले, तर जळगावात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे काही मित्र गंमतजंमत करतात, अशी मखलाशी केली. लाडक्या बहिणीच्या प्रेमाचे मोल विरोधकांना कसे समजणार, असेही ते म्हणाले. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमदार राणा यांच्या विधानामुळे महायुती सरकारची बदनामी झाल्याचा ठपका ठेवला.