विनोदी अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये विनोदी भूमिकांनी जनमानसात ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलांबरी आणि 3 मुली असा परिवार आहे. छोटेखानी आणि विनोदी भूमिकांनी मराठी, गुजराती रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे लिलाधर कांबळी हे मूळ कोकणातल्या मालवण मधील रेवंडीचे. राजा गोसावी, बबन प्रभू, आत्माराम भेडे यांच्या पाठोपाठ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा त्यांनी उमटविला.

लेकुर उंदडे झाली, प्रेमा तुझा रंग कसा, आमच्या या घरात, यासह 100 हुन आधिक नाटकात त्यांनी भूमिका केल्या वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर या भूमिकेने ते घराघरात पोहचले. काचेचा चंद्र ,हिमालायची सावली ह्यासारख्या नाटकातही त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या भरत दाभोळकर यांनी केलेल्या विग्लींश नाटकांमध्येही कांबळी यांनी छाप सोडली. मराठी मालिका, चित्रपटांमध्येही कांबळी यांनी विविध भूमिका साकारल्या. वात्रट मेले ह्या विनोदी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. या नाटकाचे अडीच हजार प्रयोग झाले. अंगविक्षेप न करता सहज अभिनयातून साकारलेला विनोद हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते. रात्री उशीरा कांबळी यांच्या ठाण्यातील बाळकुम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

माझा जवळचा मित्र गेला
लिलाधर कांबळी आणि माझी 1966 पासून मैत्री होती. कलावैभव संस्थेतल्या अनेक नाटकात त्यांनी कामे केलीय मिश्कील आणि अंगविक्षेप न करता तो विनोदी अभिनय करायचा, त्याला कारूण्याची झालर असायची. माझा खुप जवळचा मित्र गेला-गंगाधर गवाणकर, ज्येष्ठ नाटककार , माजी अध्यक्ष , अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

आपली प्रतिक्रिया द्या