नापास झाल्याने प्रेयसीने सोडले; पठ्ठय़ानं यशस्वी होऊन तिच्या घरासमोर लावल्या 75 तोफा

प्रेयसी सोडून गेली किंवा प्रियकर सोडून गेल्यावर अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. मात्र एका मराठमोळ्या तरुणाने यावर मात करत जबरदस्त कमबॅक केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रेयसी त्याला सोडून गेली, मात्र या पठ्ठय़ाने खचून न जाता जोमाने अभ्यास केला अन् पुढच्याच वर्षी यशस्वी होऊन प्रेयसीच्या घरासमोर 75 तोफा वाजवल्या. सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तरुण स्वतःच हा किस्सा सांगत आहे. तो म्हणाला, “परीक्षेची तयारी करताना प्रेमात पडलो अन् निकाल लागल्यावर नापास झालो, तेव्हा ती पण सोडून गेली. मग लक्षात आले की, पास झालो तरच कोणीही आपल्यासोबत राहणार. म्हणून एक वर्ष अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास केला. पुढच्या वर्षी पास झालो आणि जी सोडून गेली होती तिच्या दरवाजात 75 तोफा वाजवून दिल्या.’’