हिंसक आंदोलनानंतर पर्यटनाला फटका; लेहमधील हजारो कुटुंबांवर पोटापाण्याचे संकट

पर्यटन हाच रोजगाराचा एकमेव स्रोत असलेल्या लेहमधील हजारो कुटुंबांसमोर पोटापाण्याचे संकट उभे राहिले आहे. पूर्ण राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर पर्यटकांनी लडाखकडे पाठ फिरवली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हिंसाचारात पोळून निघालेल्या लेहला बसला आहे.

केंद्रशासित असलेल्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा हवा आहे. त्याचबरोबर येथील आदिवासी संस्कृती, परंपरा टिकाव्यात म्हणून घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेशाचीही लडाखी जनतेची मागणी आहे. त्यावरून सध्या तिथे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन हिंसक होऊन तेथील परिस्थिती बिघडल्याने आता तिथल्या रोजगारावर गदा आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांनी इकडे येणेच थांबवले आहे. ऑपरेशन सिंदूर, त्याआधी मुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे आधीच येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. त्यात आंदोलनाची भर पडल्याने आता सगळेच ठप्प झाले आहे.

लडाख महोत्सवाचे आयोजन करून पर्यटनाला चालना देण्याची तयारी सुरू होती. मात्र अचानक आंदोलन झाल्यामुळे महोत्सवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. लेहमध्ये सध्या संचारबंदी आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अधूनमधून दोन-दोन तासांसाठी संचारबंदी शिथिल केली जाते. मात्र पर्यटन पूर्ववत होण्यास बराच वेळ जावा लागेल असे दिसते. त्यामुळे स्थानिकांची चिंता वाढली आहे.

बाहेरचे लोक जमिनी घेतायत!

‘बाहेरचे लोक लडाखमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. आमची संस्कृती उद्ध्वस्त करत आहेत. लेह, लडाखवर बाहेरचे आक्रमण सुरू आहे. याआधीही अनेक चळवळी झाल्या. मात्र, गोळ्या कधीही चालल्या नाहीत. हा सगळा हिंसाचार कशासाठी सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच आमच्या मनात चीड आहे, असे लडाखी नागरिकांचे म्हणणे आहे.