
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
कसाल हुमरणेवाडी येथील प्रकाश जंगले यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला असून ही शेळी नजीकच्या जंगलात नेऊन फस्त केली आहे. गतवर्षी जंगले यांच्या आठ शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. घरापर्यंत बिबट्या येत असल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळ तालुक्यातील कसाल हुमरणेवाडी येथे राहणारे प्रकाश जंगले हे नेहमी प्रमाणेच आपल्या ताब्यातील शेळ्यांना घेऊन जवळपासचा जंगलात चरावयास घेऊन गेले होते. सायंकाळी शेळ्यां घेवून परत आल्यावर त्यांना गोठ्यात बांधले होते. रात्रौ उशिरा या गोठ्यातील एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला. गोठ्यात बिबट्या आल्याने शेळ्यांनी ओरड करण्यास सुरुवात केली. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज जंगले यांच्या कुटुंबाला आल्याने त्यांनी रात्री गोठ्यात येवून पाहीले असता त्यांना बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्याला जंगले यांची चाहूल लागल्याने बिबट्याने शेळीसहीत जंगलात पळ काढला आणि शेळी फस्त केली.
दरम्यान, गतवर्षीही बिबट्याने जंगले यांच्या आठ शेळ्या फस्त केल्या होत्या. यावर्षीही बिबट्याची नजर शेळ्यांवर असल्याने जंगले कुटुंबाला हादराच बसला आहे.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!
कसाल हुमरणेवाडी येथील प्रकाश जंगले यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तीला बिबट्याने फस्त केले आहे. घरापर्यंत बिबट्या येत असल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा वन विभागाकडून वेळीच बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.






























































