
शेतात शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून एका मादी बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील आबदारवाडी येथे घडली. या प्रकाराबाबत वन्यजीवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणाऱया अज्ञाताविरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला आहे.
आबदारवाडी येथील धायटा नावाच्या शिवारात सुमारे चार वर्षे वयाची बिबटय़ाची मादी भक्ष्याच्या शोधात आली होती. त्या ठिकाणी डुकरासाठी लावलेल्या तारेच्या फासकीत बिबटय़ाची मादी अडकली. यात तिच्या कमरेचा भाग अडकल्याने धडपडून तिचा जागीच मृत्यू झाला. एका नागरिकाने फोनवरून ही माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, पाटणचे वनपरीक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, मल्हार पेठचे वनपाल संजय भाटे व वन कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी अतुल पाटणे यांना बोलावून बिबटय़ाचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर मल्हारपेठ जंगल क्षेत्रातील एका ठिकाणी बिबटय़ाचे दहन करण्यात आले. त्यानंतर वन कर्मचाऱयांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली असता, त्यांना बिबटय़ाची पिल्ले आढळून आली नाहीत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला असून, संशयिताचा शोध सुरू आहे.
वन विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ
बिबटय़ाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेबाबत वन विभागाने कमालीची गुप्तता पाळली होती. याबाबत वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱयांना संपर्क साधला असता, याविषयी माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून टोलवाटोलवी केली जात होती.























































