बिबट्याने घातली पोलीस ठाण्यात गस्त! पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

तामीळनाडूच्या नीलगिरी जिह्यातील नादुवट्टम येथील एका लहानशा शहरात सोमवारी संध्याकाळी एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसला. मात्र ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. सोमवारी रात्री 8.25 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तामीळनाडू वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांनी सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे.

बिबट्या पोलीस ठाण्याच्या दरवाजातून आत येतो. थोडा वेळ थांबतो आणि बाहेर पडतो. बाहेर पडताना पुन्हा आजूबाजूला पाहतो आणि अंधारात रस्त्यावर निघून जातो. त्याला जाताना पाहून पोलीस ठाण्यातून कॉन्स्टेबल हळूच बाहेर येतो. बिबट्या निघून गेलाय का, याची खातरजमा करतो आणि अत्यंत सावधगिरीने दार बंद करून घेतो. शांतपणे परिस्थिती हाताळणाऱ्या कॉन्स्टेबलचे आता कौतुक होतेय. सुप्रिया साहू यांनीही कॉन्स्टेबलचे कौतुक करत म्हटलेय, ‘‘एका बिबट्याने निलगिरीतील नादुवट्टम पोलीस स्टेशनची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सलाम ज्याने शांतपणे दार बंद केले आणि वन अधिकाऱ्यांना बोलावले. कोणालाही दुखापत झाली नाही. बिबट्या जंगलात सुरक्षितपणे परतला.’’पोलीस स्टेशनमध्ये बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर युजर्सच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.