
सामना ऑनलाईन, खर्डी
किन्हवली परिसरात बिबटय़ाचा वावर वाढला असून कोंबडय़ा, बकऱ्यांचा फडशा पडत आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटय़ा कधीही वस्तीत घुसण्याचा धोका वाढला असल्याने किन्हवलीकरांनो सावधान… गावाबाहेर एकटय़ाने फिरू नका… आपल्या पाळीव प्राण्यांना मोकाट सोडू नका… असा इशारा वनविभागाने दिला आहे. तशा आशयाचे फलक वनविभागाने ठिकठिकाणी लावले आहेत. त्यामुळे परिसरातील गाव-वाडय़ांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली आणि पंचक्रोशीत बिबटय़ा शिरल्याची चर्चा सुरू असतानाच गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. मात्र किन्हवली-सरळगाव रस्त्यालगत स्मशानभूमीजवळ गुरे चारण्यासाठी गेलेल्या भास्कर देशमुख या शेतकऱ्याला बिबटय़ाचे दर्शन झाले. तर जयवंत गंभीरराव या गुराख्यालाही दोन दिवसांपूर्की सायंकाळी आमराईत बिबटय़ा दिसला. सोगाव रस्त्यालगत असलेल्या गुंडय़ाचापाडा पायवाटेकरील ‘वज्राचा ओहोळ’ येथे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत बकरी दिसली आणि परिसरात एकच खळबळ उडाली अन् एकच चर्चा सर्वत्र सुरू झाली… बिबटय़ा आला रे…
रात्रीची गस्त वाढवली
बिबटय़ा येण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण सावधगिरी म्हणून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान पंचक्रोशीत प्राण्यांच्या पाऊलखुणा घेण्याचे काम सुरू असून रात्रीची गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती किन्हवलीचे वनपाल विकास लेंडे यांनी दिली.























































