Video- पाहा बिबट्याचे चित्तथरारक रेस्क्यु ऑपरेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । खेड

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात ठाकूर पिंपरी येथे जीव धोक्यात घालून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी वन विभाग कर्मचारी आणि जुन्नर बिबट निवारा केंद्राच्या जवानांनी हे चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. या बिबट्याला रात्री उशिरा जुन्नर बिबट निवारा केंद्रात नेऊन उपचार सुरू केले आहेत.

खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या गावकऱ्यांना दिसला. गावकऱ्यांनी तातडीनं वन विभाग आणि जुन्नर बिबट निवारा केंद्राला पाचारण केलं. झुडपात लपलेल्या बिबटयाला पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. त्यामुळं बिबट्या हातातून निसटला तर धोकादायक ठरणार होतं. म्हणून रेस्क्यू टीमने सापळा रचला. पण बिबट्याला स्वतःहून बाहेर पडता येत नव्हतं. तर रेस्क्यु टीमला त्याला जिवंत जेरबंद करण्यासाठी झुडपांचा अडसर येत होता. बराच वेळ झाला तरी बिबट्या झुडपातून बाहेर येत नसल्याने तो आजारी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र तो बेशुद्ध झालाय का? हे पाहण्यासाठी रेस्क्यु टीमचे दोन जवान जीव धोक्यात घालून पुढं गेले. बेशुद्ध झाल्याची खात्री झाली. अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला. हे चित्तथरारक रेस्क्यु ऑपरेशन पार पडल्यानंतर बिबट्याला जुन्नर बिबट निवारा केंद्रात नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.