विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्या पिंजऱ्याच्या लाकडी पट्टया तोडून पसार; वन विभागाकडून शोध सुरू

विहिरीत पडलेल्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढत त्याला जीवदान देण्यात वन विभाग आणि गावकऱ्यांना यश आले. मात्र, विहिरीबाहेर येताच बिबट्याने पिंजऱ्याच्या लाकडी पट्ट्या तोडत धूम ठोकली. बिबट्याला विहिरीतून पिंजऱ्याच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच बिबट्याने पिंजऱ्याच्या मागील बाजूच्या लाकडी पट्ट्या तोडून तो पिंजऱ्यातून पसार झाला आहे. त्याचा वनविभागाकडुन शोध सुरु आहे. मात्र तो सापडला नसल्याने वन विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कोपरगाव तालुक्यातील दशरथ वाडीजवळ घनघाव वस्ती येथे शनिवारी सकाळी गौतम घनघाव यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळले होते. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला व वन विभागाला यासंदर्भात माहिती दिली. वन विभागाने रेस्क्यू टीम दुपारी 2 वाजता पोहोचली. बिबट्याची माहिती गावात पसरतात गावकऱ्यांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. पाण्यात बुडून बिबट्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी विहिरीमध्ये दोरीच्या साह्याने बाज टाकली होती. जीव वाचविण्यासाठी बिबट्या बाजीवर चढून बसला होता. गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाले. दुपारी दोन वाजता वन विभागाचे अधिकारी आले. त्यांनी बिबट्याला विहिरीतून काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला. त्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात सुद्धा आले. पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आला. त्यावेळी बिबट्या पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेली लाकडी फळी तोडत पसार झाला.

या घटनेने शेतकर्‍यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाचीही चांगलीच तारांबळ धांदल उडाली आहे. वनविभागाकडे एवढा निकृष्ट दर्जेचा पिंजरा उपलब्ध असेल तर कोपरगावचे वनविभाग खाते बिबट्या पकडण्यास सक्षम आहेत का असा प्रश्न गावकरी करत आहेत. यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.