
महायुती सरकारमधील मिंधे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील ‘पत्रयुद्ध’ गाजत आहे. मात्र, राज्यमंत्री मिसाळ यांनी शिरसाट यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र म्हणजे लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे अशा आशयाचे असल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात पहिलाच मुद्दा ‘सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. त्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही’ अशी सणसणीत चपराक देणारा आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मिसाळ यांचे पत्र हे फक्त प्रत्युत्तर नाही आपली गाठ कुणाशी आहे या सेना आणि राष्ट्रवादी दोघांना हा धडा आहे. अजुन साडेचार वर्ष बाकी आहेत, अशीही प्रतिक्रिया उमटली.
मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या 150 दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब आपल्याला अवगत असेलच. हे पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळे या बैठका अनिवार्य असल्याने त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही, असे माधुरी मिसाळ यांनी पत्रात म्हटले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात अधिकाराचा मर्यादाभंग झाल्याचा वादंग सुरू झाला आहे.