सोळा वर्षीय बालिकेवर मातृत्व लादणाऱ्या ६६ वर्षीय इसमाला सक्तमजुरी आणि जन्मठेप

सामना प्रतिनिधी । नांदेड

सोळा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या ६६ वर्षीय इसमाला पाचव्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी दुहेरी जन्मठेपेसह ५१ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडातील ५० हजार रुपये रक्कम पिडीत बालिकेला देण्याचे आदेश न्या.तोडकर यांनी जारी केले आहेत.

शहरातील सिडको भागात ब्रिजमोहन गोकुलप्रसाद जैस्वाल यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशीपासून ही बालिका कामाला गेली नाही. तेंव्हा जैस्वाल यांनी अनेकवेळा त्या बालिकेची कामावर येण्यास मनधरणी केली. परंतु बालिकेने कामावर जाण्यास नकार दिला.

काही दिवसानंतर पिडीत बालिकेचे पोट दुखत असल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. वैद्यकीय तपासणीमध्ये पिडीत बालिका गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. सदरील पिडीत बालिकेला वात्सल्य महिला राज्य सुधारगृह नाशिक येथे पाठविण्यात आले. सुधारगृहात वास्तव्य असतांना या बालिकेने दि.१६ जुलै २०१८ रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. पिडीत बालिकेच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाची कलमे ३७६ (२), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाचे कलम ६ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ (२) (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांनी केला. तपास करतांना विशाल खांबे यांनी बालिकेने जन्म दिलेल्या मुलीची डीएनए चाचणी ब्रिजमोहन जैस्वाल सोबत केली. ती तपासणी सकारात्मक आली होती. विशाल खांबे यांनी ब्रिजमोहन जैस्वाल विरुध्द न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. न्यायालयात या प्रकरणी सरकार पक्षाने ११ साक्षीदार तपासले.

न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्या.तोडकर यांनी ब्रिजमोहन गोकुलप्रसाद जैस्वाल (६६) रा.दत्तनगर, सिडको यास ३७६ (२) आणि पोस्को कायद्याची कलमे ५,३ आणि ६ नुसार जन्मठेप आणि २५ हजार रुपये रोख दंड तसेच भारतीय दंडविधानाची कलम ५०६ नुसार दोन वर्षे सक्त मजुरी, १ हजार रुपये रोख दंड तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे ३,२ आणि ५ नुसार जन्मठेप आणि २५ हजार रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या सर्व शिक्षा ब्रिजमोहन जैस्वालला एकत्रित भोगायच्या आहेत. दंडाची ५१ हजार रुपये रक्कम भरली तर त्यातील ५० हजार रुपये रोख रक्कम पिडीत बालिकेला देण्याचे आदेश न्या.तोडकर यांनी दिले आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. संजय लाठकर यांनी मांडली.