अयोध्येत रामपथ येथे पावसाचे पाणी साचल्यानंतर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता परिसर उजळून दिसावा यासाठी हजारो दिवे लावल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसात हे दिवे चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली. यानंतर अयोध्येला बदनाम करण्याचा डाव असल्याचे यादव म्हणाले.
या प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अश्विनी पांडे म्हणाले की, कंपनीच्या दाव्यात तथ्य नसून, आम्ही आमच्या स्तरावर पडताळणी करून घेतली. कंपनीने केवळ 2600 दिवे बसवले. यासाठी त्यांना 23 लाख 35 हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय 96 गोबो प्रोजेक्टर लाइटसाठी एकूण 38 लाख 74 हजार रुपये अदा करण्यात आले आहेत. कंपनीने 6400 दिवे लावल्याचा दावा करत 3800 दिवे चोरी झाल्याचे कळविले. त्यांनी दिव्यांशी संबंधित कागदपत्रे मागितली होती, पण दिली नाहीत. किती दिवे लावले याचीही माहिती मागवली होती, मात्र कंपनीने ती दिली नाही. यानंतर मे महिन्यापासून कंपनीने चोरीचे बहाणे सुरू केले. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर पूर्णपणे खोटा आहे. आम्ही कंपनीविरोधात तक्रारही दाखल केली आहे, गुन्हा दाखल केला जाईल.
या संपूर्ण प्रकरणावर अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि विकास प्राधिकरणाचे प्रमुख गौरव दयाल यांनी सांगितले की, कंपनीच्या कंत्राटदारांनी सरकारचा विश्वासघात केला आहे. जेवढे दिवे बसवल्याचा दावा करत आहेत, तेवढे दिवे त्यांनी लावलेले नाहीत. आता कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.