स्वत:च्या आईशी लग्न करणाऱ्या महिलेची कहाणी

अमेरिकेमध्ये एक चित्रविचित्र प्रेम कहाणी लोकांपुढे आली होती. यामध्ये मुलीने आईशी लग्न केलं हा एक विचित्र प्रकार होताच शिवाय आणखी एक विचित्र घटनाही त्यांच्या आयुष्यात घडली होती. फिलीस इर्विन आणि लिलीयन फेडरमन अशी या महिलांची नावे आहेत. या दोघींच्या प्रेमसंबंधांमुळे आणि लग्नामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती.

1971 साली अमेरिकेत महिला मुक्तीचे वारे वाहायला लागले होते. त्याच सुमारास कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्राध्यापिका लिलीयन फेडरमन यांनी अकादमीच्या संचालिका फिलीस इर्विन यांच्याशी संपर्क साधला होता. नव्या शैक्षणिक कार्यक्रमासंदर्भात बोलण्यासाठी म्हणून ही चर्चा सुरू झाली होती. मात्र इथूनच या दोघींच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या दोघी जेव्हा भेटल्या तेव्हा समलिंगीं जोडप्यांच्या दृष्टीने अमेरिकेत वातावरण चांगले नव्हते.

कॅलिफोर्नियामध्ये 1975 साली समलिंगी संबंधांना मान्यता देणारा कायदा संमत करण्यात आला होता. संमत झाल्याच्या पुढच्याच वर्षी तो लागूही करण्यात आला. हा कायदा संमत झाला असला तर समलिंगी संबंध असणाऱ्यांना अमेरिकेसह जगाच्या विविध भागात अपराधी मानलं जात होतं असं लिलियन यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. तिने सांगितलं की जेव्हा ती फिलीसला भेटली तेव्हा तिचं वय तिशीच्या घरात होतं आणि फिलीसचं वय पन्नाशीच्या घरात होतं.

फिलीस लिलीयन एकमेकींच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र संबंधांबद्दल वाच्यता करणं हे महागात पडू शकतं हे ओळखून या दोघींनी आपले संबंध लपवून ठेवले होतं. मात्र लिलीयन काम करत असलेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधांबाबत कुणकुण लागली होती. दोघी सतत एकत्र फिरत असल्याने या दोघींना लिलीयन अँड लिलीस असं चिडवलं जात होतं. लिलीयनने समलिंगी संबंधांवर लिहायला सुरुवात केल्यानंतर ती लिलीयनसोबत सतत का असते याचा सगळ्यांना उलगडा झाला.

1974 साली दोघींनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. त्याकाळी ‘सिंगल मदर’ म्हणजे पित्याशिवाय मूल जन्माला घालणं आणि वाढवणं ही संकल्पना बरीच प्रसिद्ध झाली होती. मात्र समलिंगी जोडपं गर्भधारणेसाठी गेल्यास त्यांना परवानगी मिळणं अशक्य होतं. यासाठी लिलीयनने आपण ‘सिंगल मदर’ बनण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत अपत्यप्राप्ती करून घेतली होती. 1975 साली लिलीयन आणि फिलीसला मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी एव्हरॉम ठेवलं.

मुलगा झाल्यानंतर या दोघींना चिंता सतावायला लागली की त्यांच्यात कोणतंच कायदेशीर नातं नाहीये. जर एव्हरॉम आजारी पडला आणि फिलीसला त्याला डॉक्टरकडे न्यावं लागलं तर ती पालक नसल्याने तसं करू शकत नव्हती. लिलीयनच्या जीवाचं बरंवाईट झालं असतं तर तिच्या पश्चात एव्हरॉमवर फिलीसला कोणताही हक्क सांगता आला नसता. यावर कॅलिफोर्नियामधील एक कायदा त्यांच्यासाठी आशेचा किरण बनला होता. वयामध्ये 10 वर्षांचे अंतर असल्यास एक सज्ञान व्यक्ती दुसऱ्या सज्ञान व्यक्तीला दत्तक घेऊ शकते असं म्हणणारा तो कायदा होता. या कायद्याचा आधार घेत फिलीसने लिलीयनला दत्तक घेतलं. यामुळे ती एव्हरॉमची आजी झाली. 2008 साली समलिंगी जोडप्याला लग्नाची परवानगी मिळाली. ज्या दिवशी हा कायदा अस्तित्वात आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिलीयन आणि फिलीसने लग्न केलं.

दोघींनी जरी लग्न केलं तरी तिथे एक अडचण आली. फिलीसने लिलीयनला दत्तक घेतलं होतं. ही प्रक्रिया रद्द केल्याशिवाय दोघींना लग्न करता येणं कायदेशीररित्या शक्य नव्हतं. 2015 साली अमेरिकेच्या सगळ्या प्रांतामध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देणारा कायदा अस्तित्वात येईपर्यंत दोघींना वाट पाहावी लागली. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दत्तक प्रक्रिया रद्द केली आणि नंतर लग्न केलं. यानंतर फिलीसने एव्हरॉमला दत्तक घेतलं आणि कायदेशीर अडचणी संपवल्या. फिलीसने जेव्हा एव्हरॉमला दत्तक घेतलं तेव्हा त्याची बायको आणि मुलगा हे देखील हजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या