
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी मोदी सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. या घोटाळ्यातून आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आज निर्दोष सुटका केली. या दोघांविरोधात पुरावे नसून आरोप सिद्ध होत नाहीत. ‘यात घोटाळय़ाचा कट रचला गेला’ असे कथानक सीबीआयने रचण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत न्यायालयाने तपास यंत्रणेवर चाबूक ओढला. या निकालामुळे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ज्यावरून बोंबाबोंब केली तो घोटाळाच बोगस निघाला आहे. निकालानंतर केजरीवाल भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. ‘‘आज सत्याचा विजय झाला,’’ म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली. या प्रकरणातील सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले. तत्कालीन ‘आप’ सरकारने दिल्लीत नोव्हेंबर 2021मध्ये आबकारी धोरण आणले होते. या धोरणात घोटाळा असल्याचा आरोप करून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी जुलै 2022मध्ये सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सीबअीआय आणि ईडीने तपास सुरू करत वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी तर अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आज निर्णय देताना न्यायालयाने सीबीआयवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले.
मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह बीआरएसचे नेते व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनाही अटक करण्यात आली होती.
कायद्याची चौकट पाळली नाही
न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, मद्य धोरण तयार करताना कोणताही कट किंवा गुन्हा करण्याचा हेतू नव्हता. सीबीआयने कटाबाबत एक कथा रचली. मात्र ती ठोस पुरव्यांऐवजी अंदाजांवर आधारीत होती. केजरीवाल यांचे नाव कोणत्याही ठोस पुराव्याअभावी जोडण्यात आले. एखाद्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात प्रकरण असल्यास कोणत्याही ठोस पुराव्यांविना आरोप करणे कायद्याच्या मूळ सिद्धांताविरोधात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यासह सर्व 23 आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला सीबीआयने लगेचच दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.
हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात अनेक त्रुटी आहेत. कोणतेही आरोप कोणाची साक्ष किंवा जबाबातून सिद्ध होत नाहीत. आरोपपत्रात प्रचंड विरोधाभास आहे. मुख्य आरोपी कुलदीप सिंग यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते तरीही त्यांना प्रथम आरोपी का बनवण्यात आले? – विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह
केजरीवाल यांचे भाजपला आव्हान
आज माझ्या मनावरचे मोठे ओझे कमी झाले आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीत निवडणुका घ्या, भाजपला 10 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास मी राजकारण सोडेन, असे म्हणत भाजपला खुले आव्हान दिले.
मोदी ट्रम्पसमोर मांजर झाले
नरेंद्र मोदींवर टीका करताना केजरीवाल म्हणाले, आज देशातील व्यापारी, उद्योगपती, शेतकरी आणि तरुण दुःखी आहेत. ट्रम्प दररोज मोदींना शिवीगाळ करतात. पंतप्रधान मोदी त्यांना काहीही बोलू शकत नाहीत. मोदी ट्रम्प यांच्यासमोर मांजर झाले आहेत.































































