चंद्रपूर जिल्ह्यातील चकपिरंजी या गावात ग्रामसभेने अनोखा ठराव पारित केला आहे. गावात जो कुणी अवैध दारू विक्री करेल त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, असा हा ठराव करण्यात आला आहे.
चकपिरंजी हे गाव सावली तालुक्यात असून चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर आहे. या गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत असून, यामुळे गावकरी त्रस्त आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभेत निवेदन देत दारूविक्रीवर आळा घालण्याची मागणी केली. नागरिकांची ही मागणी मान्य करीत ग्रामसभेने कठोर निर्णय घेतला.
गावातील जो कुणी अवैधरीत्या दारूविक्री करेल, त्याला एकाही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही. ग्रामसभेच्या या ठरावाविरोधात जर कुणी अधिकारी किंवा पदाधिकाऱ्याने कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असाही ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. असा ठराव घेणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्राम पंचायत आहे. यामुळे नागरिक सुखावले आहेत.