स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील फुटपाथवर घरगुती सिलिंडरचे जिवंत ‘बॉम्ब’ ठेवले असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाची ही गॅस एजन्सी असून जवळपास 50 हून अधिक सिलिंडरने फुटपाथ गिळंकृत केला आहे. या जिवंत बॉम्बने नागरिकांची झोप उडाली असून एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.
म्हाडा वसाहती जवळील शांतीवन सोसायटी बाहेरील फुटपाथवर घरगुती सिलिंडर्स ठेवण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता एका गॅस एजन्सी चालकाने या ठिकाणी बिनधास्तपणे सिलिंडर ठेवण्यात आले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाचा हा उद्योग असून भीतीच्या छायेखाली उघडपणे तक्रार देता येत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. लवकरात लवकर सहाय्यक आयुक्तांनी लक्ष घालून फुटपाथवर बेकायदेशीरपणे ठेवलेले सिलिंडर्स हटवावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.