हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. दोघांना पृथ्वीवर परतताना तीन भयंकर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रसंगी त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज अमेरिकेच्या सैन्य दलाचे माजी कमांडर रुडी रिडोल्फी यांनी व्यक्त केला आहे. बिघाड झालेल्या अंतराळ यानातून त्यांनी पृथ्वीवर परतण्याचा प्रयत्न केला तर घर्षण होऊन निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे दोन्ही अंतराळवीरांची अक्षरशः वाफ होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. बोइंग स्टारलाइनर या अंतराळ यानाला पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून योग्य दिशेचा वापर करायला हवा. असे केले नाही तर अंतराळ यानाचा स्फोट होऊन ते पुन्हा अंतराळातच समाविष्ट होण्याचा धोका असल्याचे रुडी रिडोल्फी यांनी म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्याकडे केवळ 95 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असणार आहे.
10 दिवसांचा प्रवास लांबला
ही अंतराळ यात्रा 10 दिवसांचीच होती, परंतु यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही अंतराळ यात्री गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळातच अडकले आहेत. दोघांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने स्पेस एक्सच्या ड्रकन कॅप्सुलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.