पालकमंत्री राम शिंदे यांच्या रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

16

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पालकमंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील बंगल्या जवळुन जाणारा चौंडी ते देवकर वस्ती दोन कि. मी. चा अंदाजे दोन कोटी खर्चाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. याच कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राम शिंदे यांचे हस्ते रविवार दि. ७ रोजी होत आहे. जर मंत्र्याच्या गावात अशी परिस्थिती असेल तर तालुक्यातील कामांचे न विचारलेले बरे!

जामखेड तालुक्यातील चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे ही गाव आहे. गावातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात पालकमंत्री राम शिंदे हे निधी उपलब्ध करून देत आहेत. परंतु काम करणारे ठेकेदार काम व्यवस्थित करीत नाहीत. याची प्रचिती खुद्द पालकमंत्र्यांच्या गावात आली. आज दि ४ रोजी चौंडी ते देवकर वस्ती दोन किमी च्या अंदाजे दिड कोटी रुपयांचा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. या छोट्याशा रस्त्यासाठी एवढा मोठा निधी दिला जातो पण काम करणारे ठेकेदार काम करतांना बाजुला असणारी माती काढुन टाकत आहेत व त्यावर अल्पसा मुरूम टाकत आहेत, हे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी काम बंद केले. या मातीवर डांबर टाकले गेल्यास हा रस्ता खचणार आहे, असे ग्रामस्थांनी संबंधीत ठेकेदाराला सांगितले. त्यावर ठेकेदाराने ग्रामस्थांना उद्धटपणे सांगितले की, निवेदेतच मातीचा उल्लेख आहे. यावर ग्रामस्थ चिडले आणि काम बंद केले.

याच ठेकेदाराने गावातील इतर कामे निकृष्ट केलेली आहेत. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अंतर्गत गटारी उतार दिलेला नसल्याने पाणी तुंबत आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. यावर ठेकेदार पुन्हा उद्धटपणे म्हणाला की, तेव्हाच काम का बंद केले नाही. तालुक्यातील जवळा येथील कामे देखील याच ठेकेदारने केली आहेत. तिथेही नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. एवढ्या तक्रारी होऊनही पुन्हा त्यालाच कामे दिली जातात. यावरुन नेमके पाणी कुठे मुरत आहे अशीही चर्चा सुरू आहे.

या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राम शिंदे यांचे हस्ते दि ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. यावेळी चौंडीचे ग्रामस्थ तक्रार करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या