महावितरणचा झटका! बीड जिल्ह्यात पुन्हा भारनियमन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाच दुसरीकडे महावितरण कंपनीने संपूर्ण जिल्हाभरात पुन्हा भारनियमन सुरू केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता त्यातच सोमवार पासून सुरू झालेले भारनियमन यामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला येतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवावर या भारनियमनामुळे अंधकाराचे सावट उभे ठाकले आहे.

सोमवार दि. 8 पासून संपूर्ण जिल्हाभरात महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देताच भारनियमन सुरू केले. हे भारनियमन शहरी – ग्रामीण भागात 3 ते 12 तास केले जाणार आहे. ग्रामीण भागात या भारनियमनाचा जास्त परिणाम दिसून येत असून एकीकडे हातून जात खरिपातील काही पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी विजपंपाद्वारे पिकांना पाणी देत असतांनाच महावितरणने सुरू केलेले भारनियमन शेतकऱ्यांच्या मुळावरच येऊन बसलेले आहे.

सणासुदीचे दिवस असतांना देखील भारनियमन पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना नाहक त्रास होतांना दिसत आहे. एकीकडे महावितरण ग्राहकांकडून पठाणी वसुली करत असतानाच दुसरीकडे मात्र कमी वसुली असलेले तसेच विजेची गळती असलेले फिडर दाखवत भारनियमन करत आहेत. महावितरण कडे येत असलेल्या मिटर रीडिंग मध्ये असलेल्या मोठ्या त्रुटीबाबत आलेल्या तक्रारीकडे महावितरणने आधी लक्ष देऊन त्या तक्रारी सोडवाव्यात अशी चर्चा वीज ग्राहकांमध्ये होत आहे.