
उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या भाजपमधील लाडक्या बहिणींनी सलग दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कार्यालयात राडा केला. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांना शिव्याशाप, तळतळाट दिले. भाजप कार्यालयासमोर जमलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी सावे, कराडांच्या गाडीवर हल्ला केला, काळे फासले. एका भाजप कार्यकर्तीने मध्यस्थी करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली. कार्यकर्त्यांचा संताप एवढा अनावर झाला होता की, सावे, कराडांना आल्यापावली पोलीस बंदोबस्तात पळून जावे लागले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या दोन महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयातच अन्नत्याग करून उपोषण केले. समजूत काढण्यासाठी आलेले शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना या महिलांनी हुसकावून लावले. भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण उपोषणार्थी महिलांना भेटण्यासाठी आल्या आणि गेल्या. दुसरीकडे सावे, कराडांना जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार संजय केणेकर यांनी चक्क गाडीत टाकून पळवून नेले.
शिंदे गटासोबत फाटताच भाजपने वाट्टेल त्याला उमेदवारीची खिरापत वाटली. निष्ठावंतांच्या भावना पायदळी तुडवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या उपऱ्यांसाठी पायघडय़ा घालण्यात आल्या. त्यामुळे नाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला. कालपासून नाराज महिलांनी भाजप कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळवारीही या महिलांनी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना आमच्यावर अन्याय का केला, असा सवाल करत सळो की पळो करून सोडले. महिला कार्यकर्त्यांचा संताप पाहून कालही सावे, कराड मागच्या दाराने पळून गेले होते.
भाजपच्या इच्छुक उमेदवार दिव्या मराठे या मंगळवारपासून या कार्यालयातच ठाण मांडून आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले. आजही त्यांचे उपोषण सुरूच होते. प्राची चव्हाण, वर्षा साळुंके या देखील बुधवारी उपोषणात सहभागी झाल्या. सकाळी भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांची भेट घेतली. पक्षाची शिस्त मोडून असे उपोषण करणे योग्य नसल्याचे शितोळे यांनी त्यांना सांगितले. त्यावर मराठे यांनी शितोळे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. त्यावर शितोळे यांनी तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे सांगताच मराठे यांनी ‘काय करणार? पक्षातून काढून टाकणार का? आताच काढून टाका!’ असे आव्हान दिले. उमेदवारी वाटपात कसा सावळागोंधळ झाला याचा गवगवा सुरू होताच शितोळे यांनी तेथून पळ काढला. दरम्यान सायंकाळी आमदार संजय केणेकर यांनी विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
सगळे खापर बावनकुळेंवर…
नाराजांची समजूत काढताना वारंवार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देण्यात आला. बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे सांगून अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांनी मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हे कोणते सर्वेक्षण आहे, कधी केले? असा प्रश्न करत नाराजांनीही त्यांच्याकडील पक्षाचे सर्वेक्षण दाखवले. त्यामुळे भाजप नेत्यांना खाली मान घालावी लागली.
सावे, कराड थोडक्यात बचावले
आज सकाळीच नाराजांच्या गर्दीने भाजपचे कार्यालय गजबजले. ‘न्याय द्या, न्याय द्या’ अशा घोषणा देत नाराजांनी कार्यालय दणाणून सोडले. खासदार डॉ. भागवत कराड हे कार्यालयात येत असतानाच नाराजांच्या जत्थ्याने त्यांच्या गाडीला घेरले. कार्यकर्त्यांचा संताप पाहून कराड गाडीबाहेर आलेच नाहीत. कराडांपाठोपाठ मंत्री अतुल सावेही आले. त्यांच्या गाडीवरही नाराजांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीला काळे फासले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी सावे, कराडांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. प्रशांत भदाणे पाटील या कार्यकर्त्याने पेट्रोल ओतून घेतले. दुसऱ्या एका कार्यकर्त्याने अंगावरचे कपडे फाडून जमिनीवर लोळण घेतली. एका भाजप कार्यकर्तीला ओरडून ओरडून भोवळ आली. पोलिसांनाही हे कार्यकर्ते जुमानत नव्हते. अखेर कार्यकर्त्यांचा अनावर संताप पाहून सावे आणि कराड हे आल्यापावली परत गेले.
मिंधेगटाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या घरासमोर नाराज कार्यकर्त्यांचा ठिय्या
भाजप पाठोपाठ मिंधेगटातही नाराज कार्यकर्त्याचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. मनपा निवडणूकीसाठी प्रभाग-20 मधून मिंधेगटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या सुनील सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठाण मांडले.
भाजप आणि मिंधेगटाची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांना सर्व जागांवर उमेदवार देण्यासाठी धावपळ करावी लागली. यात ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी भाजप कार्यालयात दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला. नाराजीचा पेंद्रबिंदू आज मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याकडे सरकला. प्रभाग 20 मध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे संतापलेले सुनील सोनवणे यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांसह ठाण मांडले. मी पक्का दावेदार असतानाही भाजपमधून आलेल्या उपऱ्याला तिकिट दिले, मला नाकारण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला.
भाजपने दिलेले उमेदवार आम्ही पाडणार!
सावे, कराड निघून गेल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा आम्ही पराभव करणार, असे ठणकावून सांगितले. आमच्यावर अन्याय करणाऱ्या नेत्यांना आम्ही प्रभागात फिरू देणार नाही, असा निर्धारही या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. नेत्यांच्या मागेपुढे करणाऱ्यांना तिकीट मिळाले. मंत्री अतुल सावे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीला तिकीट दिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी पक्षात आलेल्यांना तिकीट देण्यात आले, मग आम्हीच काय पाप केले? असा सवाल या नाराज कार्यकर्त्यांनी केला. भाजप नेत्यांनी तिकिटे विकल्याचा गंभीर आरोपही काही नाराजांनी केला. मात्र खासदार डॉ. भागवत कराड यांनी या आरोपाचा इन्कार केला.





























































