फायझर कंपनीची दंडेलशाही, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच ठोकले टाळे

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कायदेशीर प्रक्रियाला फाट्यावर मारून दंडेलशाही दाखवत फायझर व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याची भूमिका घेतल्याने शेकडो कामगारांच्या संसारावर वरवंटा फिरविला आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील फायझर कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो कामगारांचा संसार उघड्यावर पडणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कामगार जगतात खळबळ उडाली आहे. मात्र, कंपनीने घेतलेला हा निर्णय एकतर्फी घेतला आहे. कामगारांना कुठलीही माहिती न देता असा निर्णय घेतल्याने कामगारांचा एकच गोंधळ उडाला आहे.

सीएमआयची संभाजीनगरातील औद्योगिक वसाहतीमध्ये गुंतवणूक वाढावी, ही भूमिका राहिली आहे. जागतिक बाजारपेठेचे कारण दाखवून या कंपनीने कंपनी बंद करण्याची नोटीस दिली. पुढील सहा महिन्यांत निर्णय होऊ शकतो. कुठल्याही सरकारी नियम वा कायद्याचे पालन करून कंपनीने बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. कंपनीतील उत्पादने निर्यात होत होती. बाजारपेठेतून निर्यात बंद झाल्यामुळे कंपनी बंद करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. मात्र, या कंपनीच्या जागेवर दुसरी कंपनी येऊ शकते, असे मत सीएमआयचे अध्यक्ष राम भोगले यांनी व्यक्त केले. एमआयडीसीकडून उद्योगासाठी सोयी-सुविधापूर्ण भूखंड उपलब्ध करून दिला जातो. या भूखंडावर उद्योग उभारल्यानंतर त्यांची नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे असते. उद्योग बंद करण्याबाबत ते जिल्हा उद्योग केंद्राला कळवू शकतात. एमआयडीसीला केवळ भूखंड हस्तांतराच्या वेळेस माहिती मिळू शकते. त्यामुळे या कंपनीने अद्याप संपर्क साधलेला नाही, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.

कायद्याचे उल्लंघन करून अशा प्रकारे कंपन्या बंद करत कामगारांना रस्त्यावर आणणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी. कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कामगारांना धास्ती भरली आहे. अशा प्रकारे कंपन्या बंद होणे, हा वाईट संदेश जगाला जात आहे, परिणामी येथे होऊ घातलेल्या उद्योगांवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे. यातून सरकार काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे मत भारतीय कामगार सेना मराठवाडा सचिव प्रभाकर मते यांनी व्यक्त केले.