Lok Sabha Election 2024 : सांगलीत 20 उमेदवार आखाडय़ात

सांगली लोकसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या आखाडय़ात 20 उमेदवार राहिले असून, त्यांना चिन्हवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, ‘स्वाभिमानी’चे महेश खराडे व ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांच्यासह अन्य पक्ष व अपक्षांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसचे ‘डमी’ अर्ज भरलेले माजी मंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील यांच्यासह पाचजणांनी माघार घेतली. याशिवाय दिगंबर गणपत जाधव, रेणुका प्रकाश शेंडगे, सुरेश तुकाराम टेंगले आणि बापू तानाजी सूर्यवंशी या अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज काढून घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननीनंतर एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20पैकी पाचजणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता उर्वरित 20 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

भाजपचे संजयकाका पाटील यांना ‘कमळ’, शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना ‘मशाल’ आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विशाल पाटील यांना ‘शिट्टी’ तर ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांना ‘रिक्षा’ हे चिन्ह मिळाले आहे. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.