टीव्ही चॅनेल्सच्या एक्झिट पोलनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र हे सर्वेक्षण झाले कधी, सर्वेक्षण करताना कुणीही दिसले नाही अशा प्रतिक्रिया जनतेमधून येऊ लागल्या आहेत. अनेक चॅनेल्सनी स्वतःच आपली पोलखोल करून टाकली आहे. निवडणूक झालेल्या जागांपेक्षा जास्त जागा या पोलवाल्यांनी भाजपच्या पदरात टाकल्या आहेत.
राजस्थानात लोकसभेच्या 25 जागा आहेत. ‘आज तक’च्या एक्झिट पोलमध्ये तिथे एनडीएला 33 जागांवर विजय मिळेल असे सांगण्यात आले.
हिमाचल प्रदेशात 4 मतदारसंघ आहेत. ‘झी टीव्ही’च्या एक्झिट पोलने तिथे एनडीला 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला.
‘झी’च्या एक्झिट पोलने हरियाणातील अंदाज वर्तवताना कहरच केला आहे. हरियाणात एकूण 10 जागा आहेत, पण ‘झी’वाल्यांनी एनडीएला 16 ते 19 जागा दाखवल्या आहेत.
…हे तर मोदी-मीडिया पोल
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या एक्झिट पोल्सवर टीका केली आहे. हे एक्झिट पोल नाहीत तर मोदी-मीडिया पोल आहेत, हे त्यांचे फॅण्टसी म्हणजेच काल्पनिक पोल आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. एक्झिट पोलबाबत प्रसारमाध्यमांनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी एक्झिट पोल भाजपच्या प्रभावाखाली बनवले गेल्याचे सांगितले. ‘इंडिया’ आघाडीला किती जागा मिळतील असेही माध्यमांनी राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी सिद्धू मुसेवाला यांचे 295 गाणे ऐकलेय का, असे सांगत ‘इंडिया’ आघाडीला 295 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.