भाजपच्या लापता लेडीज; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जबरदस्त फटका बसला आहे. भाजपने या निवडणुकीत ज्या महिलांना उमेदवारी दिली, त्यात अनेक महिला उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभव झाल्यानंतर गायब झालेल्या नेत्यांना सोशल मीडियावर भाजपच्या ‘लापता लेडीज’ आता कुठे आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. यात सर्वात जास्त भाजप नेत्या स्मृती ईराणी यांना लक्ष्य केले जात आहे. त्यानंतर अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या नवनीत कौर राणा यांना लक्ष्य केले जात आहे. या नेत्यांवर अनेक मीम्ससुद्धा केले जात आहेत. या नेत्यांसह केंद्रिय मंत्री मनेका गांधी, भारती पवार, पंकजा मुंडे, हिना गावित या नेत्यांवरही ‘लापता लेडीज’ असा उल्लेख केला जात आहे.

केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री भारती पवार या महाराष्ट्रातील दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) भास्कर भगरे यांच्याकडून 5 लाख 77 हजार 339 मतांनी पराभूत झाल्या.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मेनका गांधी यांचा सुलतानपूर मतदारसंघात दारुण पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या रामभुआल निषाद यांनी मेनका गांधी यांचा 43 हजार 174 मताधिक्याने पराभव केला आहे.

2019 साली विजयी झालेल्या भाजप खासदार हिना गावित या 2024 च्या निवडणुकीत नंदुरबारमधून पराभूत झाल्या आहेत.

दोघींनाही अहंकार नडला

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभूत झाला आहे. त्यांना निवडणुकीमध्ये 1 लाख 67 हजार 196 मतांनी पराभूत व्हावं लागलं. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा हे अमेठी मतदारसंघात विजयी झाले आहेत. तर महाराष्ट्रातील अमरावतीमधील भाजपच्या उमेदवार नवनीत काwर राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी दारुण पराभव केला आहे. निवडणुकीआधी सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱया नवनीत राणा निकालानंतर गायब झाल्या आहेत.