मुंबई महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालायाचा लवकरच कायापालट होणार आहे. या रुग्णालयांच्या पुनर्विकासात अनेक अद्ययावत सुविधा आणि रुग्णांसाठी नव्या सोयी निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी पालिका तीन हजार कोटींचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावांना विधानसभा निवडणुकीआधीच मंजुरी मिळाली आहे.
या कामामध्ये शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचा पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसऱया टप्प्यातील हा पुनर्विकास असून 13 व 14 मजल्यांच्या एकूण चार इमारतींचे बांधकाम आणि दोन रुग्णालय इमारतींना जोडणारे पादचारी पूल आदी काम करण्यात येत आहे. तसेच राजावाडी रुग्णालयाचाही पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. राजावाडी रुग्णालयच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन इमारत बांधली जाणार आहे. यासाठीदेखील आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजुरी मिळाली आहे.पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालयावरील वाढलेला रुग्णांचा ताण लक्षात घेता या रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन रुग्णालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तळ घर, तळ मजल्यासह 10 मजल्यांची इमारत बांधली जाणार असून यासाठी सुमारे 665 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तब्बल 1020 खाटांचे हे रुग्णालय बांधले जाणार आहे.
अशी होणार कामे
शीव रुग्णालयातील 2235 खाटांची 14 मजली मुख्य इमारत, 572 खाटांची 13 मजली इमारत, 213 खाटांचे 14 मजली इमारत, 13 मजली ओपीडी इमारत तसेच शीव रुग्णालय इमारत ते बराक भूखंड जोडणारे पादचारी पूल अशा स्वरुपाचे काम असणाऱया पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांना विविध करांसह 2462 कोटींचा खर्च येणार आहे. तर राजावाडी रुग्णलयाच्या इमारतीसाठी 665 कोटी रुपये असे दोन्ही रुग्णालय प्रकल्पांसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.