भोंदूबाबा अशोक खरातच्या पत्नीला लूकआऊट नोटीस जारी, एसआयटी पथक कल्पना खरातच्या माहेरी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता अहिल्यानगर पोलिसांनी तिला लुकआऊट नोटीस बजावली आहे. नगर पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे तिचा परदेश पलायनाचा डाव फसणार असे मानले जात आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना फरार असल्याने, एसआयटीकडून आता जवळच्या नातलगांची चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. एसआयटीचे पथक आता कल्पना खरातच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेल्यानंतरही कल्पना खरात यांचा अद्याप काहीही थांगपत्ता लागत नसल्याने, अखेर लूकआऊट नोटीस एसआयटीकडून जारी करण्यात आली आहे.

शिर्डीमध्ये जमीन हडपण्याचा गुन्हा कल्पना खरात यांच्यावर दाखल झालेला आहे. अशोक खरातसह कल्पना देखील सहआऱोपी आहेत. शिर्डी नाशिक पोलिस तिच्या मार्गावर आहेत. परंतु ती पोलिसांना हुलकावणी देत पसार झाली.

कल्पना खरात परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेमुळेच आता नाकाबंदी करुन, लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर हा सर्वात आधी शिर्डी पोलिसांकडून करण्यात आला होता. अशोक खरात देखील परदेश पलायनाच्या तयारीत होता, परंतु तो डाव फसला आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
भोंदूबाबाच्या मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. आता एसआयटी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने, कल्पना खरात यांच्या माहेरी मोर्चा वळवला आहे. सिन्नर येथील पाडळी या गावात त्यांचे माहेर असल्याने, तिथे चौकशी केली असता माहेरच्यांशी त्या गेली 16 वर्षे संपर्कात नसल्याचे समजले. भोंदूबाबाने त्यांना माहेरच्यांशी कोणतेही संबंध ठेवू दिले नसल्याची माहिती माहेरच्यांकडून तपास पथकाला देण्यात आली.