कर्जतमध्ये भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे आज दिसून आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या झालेल्या चिंतन शिबिरासाठी भुजबळ यांचे आज कर्जतमध्ये आगमन होताच मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बैलाला घो.. अशा संतप्त घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मुरबाडमार्गे छगन भुजबळ हे कर्जतमध्ये येत असताना दहिवली येथील यशवंतराव हॉलजवळ त्यांच्या स्वागतासाठी ओबीसी समाजाचे काही कार्यकर्ते थांबले होते. भुजबळ यांच्या गाडीचा ताफा तेथे येताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येऊन त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेले भुजबळ त्वरित पुढच्या प्रवासाला रवाना झाले. दरम्यान शहापूर येथे बोलताना छगन भुजबळ यांनी बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जात गणना करावी, अशी मागणी केली आहे. भुजबळ यांनी शहापूर तालुक्यातील वालशेत गावात जाऊन उपोषणास बसलेल्या भरत निचीते यांची भेट घेतली.