कमर्शियल एलपीजी गॅसची टंचाई कायम राहिल्यास 2-3 दिवसांत 50 ते 60 टक्के रेस्टॉरंट्स बंद होण्याची शक्यता, हॉटेल मालकांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरू झाला नाही, तर देशातील 50 ते 60 टक्के रेस्टॉरंट्स पुढील दोन ते तीन दिवसांत बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भिती नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI)चे अध्यक्ष सागर दर्यानी यांनी व्यक्त केली आहे. NRAI ही संस्था देशातील सुमारे 5 लाख रेस्टॉरंट्सच्या हिताचे प्रतिनिधित्व करते. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

सागर दर्यानी, जे Wow! Momo Foods Pvt. Ltd. चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत, यांनी सांगितले की रेस्टॉरंट्स बंद करणे हा शेवटचा पर्याय असेल. “आम्ही लोकांना अन्न देण्याच्या व्यवसायात आहोत. शक्य तितके स्नॅक्स किंवा जे काही बनवता येईल ते देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण परिस्थिती अशीच राहिली तर दोन-तीन दिवसांत व्यवसाय चालू ठेवणे कठीण होईल,” असे त्यांनी सांगितले.

दर्यानी यांनी सध्या परिस्थितीबाबत संभ्रम असल्याचेही नमूद केले. “व्यावसायिक एलपीजी सिलिंडर बंद केले जाणार आहेत किंवा उपलब्ध होणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे. या भीतीमुळे पुरवठ्यात मोठी कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी काळाबाजार, साठेबाजी वाढली असून किंमतीही दीडपट वाढल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, सरकारचा उद्देश घरगुती वापरासाठी एलपीजीला प्राधान्य देण्याचा असू शकतो. मात्र अनेक लोक रोजच्या जेवणासाठी रेस्टॉरंट्सवर अवलंबून असतात, त्यामुळे रेस्टॉरंट उद्योगालाही अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट केले पाहिजे.

संपूर्ण उद्योगावर परिणाम

दर्यानी यांनी सांगितले की ही समस्या केवळ काही रेस्टॉरंट्सपुरती मर्यादित नाही. “आमच्या सदस्यांपैकी सुमारे 80 टक्के रेस्टॉरंट्स एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. उर्वरित 20 टक्के ठिकाणी पाइप गॅस (PNG) उपलब्ध आहे, जो प्रामुख्याने मॉल्स किंवा मोठ्या व्यावसायिक संकुलांमध्येच आहे. सर्वत्र त्याची सुविधा उपलब्ध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्समध्ये काही प्रमाणात इंडक्शनचा वापर होत असल्याने ते काही प्रमाणात चालू राहू शकतात. मात्र मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणारी कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन, फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स आणि बुफे चेन यांना मोठा फटका बसणार आहे. बार्बेक्यू नेशन, मेनलँड चायना आणि पंजाब ग्रिलसारख्या रेस्टॉरंट्सवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

त्यांनी सांगितले की दक्षिण भारतीय पदार्थांसारख्या अनेक खाद्यपदार्थांची तयारी इंडक्शनवर करणे अत्यंत कठीण आहे. शिवाय बहुतेक स्वयंपाकघरे गॅसवर आधारित पद्धतीनुसारच तयार केलेली आहेत. त्यामुळे तातडीने इंडक्शनकडे वळणेही शक्य नाही. त्यासाठी विद्युत क्षमतेसह स्वयंपाकघराच्या संरचनेत मोठे बदल करावे लागतील.

पाचतारांकित हॉटेल्सवरही परिणाम

दर्यानी यांनी सांगितले की ताज, आयटीसी आणि हयातसारख्या पाचतारांकित हॉटेल्सवरही या परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. “त्यांची स्वयंपाकघरेही गॅसवर आधारित असल्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

या समस्येबाबत NRAI ने पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच उद्योग व वाणिज्य मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. संबंधित मंत्र्यांशी लवकरच बैठक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

काही शहरांमध्ये परिस्थिती गंभीर

सध्या बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये परिस्थिती सर्वाधिक गंभीर असल्याचे दर्यानी यांनी सांगितले. “बंगळुरूमध्ये अनेक सदस्यांकडे सिलिंडरचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये अजून काही दिवसांचा साठा आहे. मुंबईबाबत मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत, मात्र पुढील काळात येथेही पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे व्यवसाय सुरू ठेवता येणार का हा आहे. “नफा-तोट्याचा प्रश्न नंतरचा आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर पुढील दोन-तीन दिवसांत 50 ते 60 टक्के रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ येऊ शकते,” असा इशारा त्यांनी दिला.