आता बाहेर खाणं महागणार, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सुरू असलेल्या आखाती प्रदेशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या एका महिन्याच्या आत व्यावसायिक एलपीजी दरात ही दुसरी वाढ असून, यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि वसतिगृहांसारख्या व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करणाऱ्या अन्न व आतिथ्य क्षेत्रातील व्यवसायांना या दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यावेळी सर्वाधिक वाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झाली आहे. दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत 1,883 वरून थेट 2,078.50 इतकी झाली असून, 195.50 म्हणजेच सुमारे 10.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजीही व्यावसायिक एलपीजीच्या दरात 114.50 ने वाढ करण्यात आली होती. त्याच दिवशी घरगुती 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली होती, ज्यामुळे दिल्लीत सिलिंडरची किंमत 913 वर पोहोचली होती, जी ऑगस्ट 2023 नंतरची सर्वाधिक आहे.

देशातील प्रमुख चार शहरांमध्येही एलपीजीच्या दरात वाढ दिसून आली असून, या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे लघु व मध्यम उद्योगांवर सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कमी कालावधीत वाढलेल्या खर्चामुळे अनेक व्यवसायांचे ऑपरेशनल खर्च वाढले आहेत.