मुंबईकरांचा लाडका वडापाव महागला! दुप्पट वाढ, 15 रुपयांवरून 30 रुपये झाला!! गॅस तुटवडा, खाद्यतेल महागले, बेसनच्या किमती वाढल्याने झाली वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलपीजीच्या तुटवड्यामुळे अनेक घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांची फरफट होत असून अनेक हॉटेल व्यावसायिकांचे धंदे मंद झाले आहेत. मुंबईकरांच्या लाडक्या वडापावलाही याचा फटका बसला आहे. एलपीजीचा तुटवडा असताना खाद्यतेल, बेसनासह अन्य साहित्याचे भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या पोटाला आधार देणारा व 15 ते 20 रुपयांना मिळणारा वडापाव आता 25-30 रुपयांवर पोहचला आहे.

युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्याने सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच व्यवसायिक सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने मुंबई, ठाण्यासह उपनगरातील हॉटेल व्यावसायिक आणि छोटय़ा खानावळींसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे 50 टक्के हॉटेल तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याचे समोर आले आहे. व्यवसायिक गॅसचा तुटवडा होत असून काळ्याबाजारात या सिलिंडरचे दर 4 हजारांवर पोहचले आहेत.

खाद्यतेलामध्ये 10 ते 16 टक्क्यांनी म्हणजेच 30 रुपयांपर्यंत वाढले आहे. सोयाबीन तेल 96 रुपये (प्रति लिटर) 102 रुपयांना मिळत आहे. पामतेल 65 रुपयांवरून 92 रुपयांवर, शेंगदाणा तेल 90 रुपयांवरून 120 रुपयांवर तर सूर्यफूल तेल 105 रुपयांवरून 115 रुपयांवर येऊन पोहचेल आहे. तसेच बेसन, मैद्याच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. या सर्व साहित्यांसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने व्यावसायिकांना घाटा सहन करावा लागत आहे. या महागाईमुळे मुंबईसह उपनगरातील काही वडापाव व्यावसायिकांनी 2 ते 5 रुपयांनी दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा वडापाव आता 25 ते 30 रुपयांवर येऊन पोहचला आहे.

कटिंग स्पेशल 25 रुपये; प्यायचा असेल तर प्या…

व्यावसायिक गॅस सिलिंडर तुटवड्याचा कटिंग चायलाही फटका बसला आहे. ठाण्यातील प्रसिद्ध भट चहावाल्याकडे स्पेशल कटिंग चहा 10 रुपयांवरून 25 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चहाप्रेमी गिऱ्हाईकांचा हिरमोड होत आहे.

कोळसा शेगडी, इंडक्शनची मागणी वाढली

आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे हॉटेल तसेच छोटेखानी खाद्य विव्रेत्यांनी कोळसा शेगडी तसेच इंडक्शन शेगडी खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र या गॅस विरहित शेगडय़ांची मागणी वाढली असली तरी बाजारात त्यांची आवक कमी असल्याने या शेगडी खरेदीसाठी अनेकांची फरफट होत असल्याचे शेगडी व्यावसायिकांनी सांगितले.

बेकऱया बंद; पावाचा पुरवठा कमी

एलपीजीवर चालणाऱया अनेक बेकऱया सध्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे कोळशावर चालणाऱया मोजक्याच बेकऱयांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. परिणामी पावाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यातच कोळसा, मैदा, साखरसह अन्य सामग्रीचे दर वाढल्यामुळे पावाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

अनेक व्यवसायिकांना फटका

विलेपार्ले येथील श्री स्वामी वडापाव सेंटर आणि बाबू वडापाव दोन रुपयांनी महागला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने प्रभादेवीतील सारंग वडापावचे यांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक छोटय़ा व्यावसायिकांनी कोळसा शेगडी, स्टोसारख्या पर्यायी साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. चवीने खाणाऱया सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडला पाहिजे यासाठी पर्यायी मार्ग निवडत जास्त दरवाढ केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

एलपीजी दरवाढीसह गोडे तेल, बेसन आणि अन्य साहित्य महागल्याने वडापावचे दर वाढवण्यात येणार आहे. वर्षातून एकदा दर वाढवले जातात. याआधी 2024 ला दरवाढ झाली होती. या दरवाढीसंदर्भात येत्या दोन दिवसात संघटनेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दर ठरवले जातील. त्यानंतर 1 एप्रिलपासून दरवाढ केली जाईल. – अमित झावरे, व्यावस्थापक, ‘आराम’ वडापाव, फोर्ट

रिस्थिती नियंत्रणात असल्याचे मंत्र्यांकडून सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सिलिंडर मिळाला नाही तर धंदा करायचा कसा. ग्राहकांच्या खिशाला परवडलं पाहिजे म्हणून दरवाढ केलेली नाही. भाव वाढवले तर धंद्यावर त्याचा परिणाम होईल. कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मजूर आणि कारागीरदेखील काम सोडून गावी जाऊ लागले आहेत. भाव समांतर ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडीची पर्यायी निवड केली आहे. मात्र व्यावसायिक वीजपुरवठा असल्याने त्याचे बिलही खिशाला परवडणारे नसणार आहे. त्यामुळे सरकारने काही तरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. – सारंग बंधू स्नॅक्स सेंटर, प्रभादेवी

पदार्थ आधीचे दर आताचे दर
वडापाव 15 ते 20 25 ते 30
भजी पाव 18 ते 25 22 ते 30
भजी प्लेट 35 40 ते 45
समोसा पाव 20 ते 22 25 ते 30
समोसा 16 ते 18 20 ते 25

कीर्ती कॉलेजचा अशोक वडापाव बंद

मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक दादरचा कीर्ती कॉलेजजवळील अशोक वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी सामान्यांपासून सेलेब्रिटींपर्यंत आणि परदेशी पाहुणेदेखील लाइन लावतात. वडापावसह येथे चुरापावही तितकाच प्रसिद्ध आहे. या भागात येणारा प्रत्येकजण या वडापावचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही. या वडापावलादेखील एलपीजी तुटवडय़ाचा फटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर मिळत नसल्याने दुकान काही दिवसांसाठी बंद ठेवल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले.

झोमॅटोची घरपोच सेवाही महागली

झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात 19 टक्के वाढ केली आहे. झोमॅटोने युजर्ससाठी प्रतिऑर्डर प्लॅटफॉर्म शुल्कात 2.4 रुपयांची वाढ केली आहे. पूर्वी प्लॅटफॉर्म शुल्क 12.50 होते, जे आता जीएसटी वगळून 14.90 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. 2.68 रुपये जीएसटीसह झोमॅटोचे प्लॅटफॉर्म शुल्क आता 17.58 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या सात महिन्यांत प्लॅटफॉर्म शुल्कातील ही दुसरी वाढ आहे.