
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. हिंदुस्थानलाही या युद्धाचा फटका बसत असून आखातातून होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या घरांमध्ये पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे जर ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर त्यांचा गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
STORY | LPG supply to be cut off if households refuse PNG switch where available: Govt order
The government has mandated that cooking gas LPG supply to households will be discontinued if consumers fail to switch to piped natural gas where such connectivity is available, under a… pic.twitter.com/RTMR7Okcci
— Press Trust of India (@PTI_News) March 25, 2026
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूशन ऑर्डर 2026’ लागू केला आहे. जर तुमच्या भागामध्ये गॅस पाईपलाईन आली असेल तर पुढील 90 दिवसात तुमच्या घरी येणारा स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद होऊ शकतो. तुमच्या भागात गॅसची पाईलपालाईन आली असेल तर त्याचे कनेक्शन घेणे तुम्हाला बंधनकारक आहे. सूचना मिळाल्यानंतरही कुणी कनेक्शन घेतले नाही तर त्यांचा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवला जाईल. गॅस नेटवर्कचा विस्तार जलद गतीने करण्यासाठी आणि केवळ एकाच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पीएनजी कनेक्शन असलेल्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही
जर तुमच्या घरात पाईप नॅचरल गॅस कनेक्शन असेल, तर आता तुम्हाला तुमचा एलपीजी सिलिंडर सरेंडर करावा लागणार आहे. केंद्र सरकारने 14 मार्च रोजीच याबाबत आदेश जारी केला होता. पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन मिळणार नाही आणि जुना सिलिंडर रिफिलही होणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
सिलिंडर बुकिंगच्या नियमांत कोणताही बदल नाही
घरगुती एलपीजी (LPG) रिफिल बुकिंगच्या कालमर्यादेत बदल झाल्याच्या बातम्या केंद्र सरकारने बुधवारी फेटाळून लावल्या आहेत. सोशल मीडियावर फिरणारी ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले असून, सध्याची बुकिंग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे आश्वासन दिले आहे.
सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी 45 दिवस, तर बिगर-उज्ज्वला ग्राहकांसाठी 25 ते 35 दिवसांचे नवीन अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले की या दाव्यांना कोणताही आधार नाही. मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार, एलपीजी रिफिल बुकिंगसाठी शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवस हीच पद्धत लागू राहणार आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा. अफवांमुळे घाबरून जाऊन अनावश्यक बुकिंग करू नका, असे आवाहन कंपनीने केले आहे.


























































