नोकऱ्या मागण्यासाठी गेलेल्या भूमिपुत्रांवर भाजप आमदार बालदी यांच्या बगलबच्च्यांचा तलवारीने हल्ला; सरपंच, सदस्यांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी

भाजप आमदार महेश बालदी यांच्या गुंड समर्थकांनी उरणच्या पागोटेत तुफान धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. पागोटे ग्रामपंचायत हद्दीत एल अॅण्ड टी कास्टिंग यार्ड प्रकल्पात कामगार भरती करताना स्थानिकांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी सरपंचांसह गावकरी कंपनी व्यवस्थापकांबरोबर चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असलेला बालदी यांचा समर्थक किरण पंडित व त्याच्या अन्य गावगुंडांनी भूमिपुत्रांना शिवीगाळ करत थेट तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरपंच, सदस्यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपच्या गुंडांकडून खुलेआम दहशत माजवली जात असताना पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने उरणकरांनी संताप व्यक्त केला आहे.

पागोटे ग्रामपंचायत हद्दीत एल अॅण्ड टी कास्टिंग यार्ड कंपनीच्या माध्यमातून कलर निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कंपनीत नोकरभरतीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. याच मुद्द्यावर सरपंच, सदस्य, ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेले आमदार महेश बालदी समर्थक किरण पंडित यांनी सरपंच कुणाल पाटील आणि ग्रामस्थांना शिवीगाळ केली. इतकेच नाही तर सौरभ पाटील, अतिश पाटील, संतोष पाटील तसेच भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांमधून तलवारी काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीदेखील केली होती दमदाटी

पंडित व त्यांच्या बगलबच्च्यांनी 10 एप्रिल रोजीदेखील गावकऱ्यांना अशीच दमदाटी केली होती. त्यानंतर २२ एप्रिल रोजी पुन्हा सरपंच, सदस्य, ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेले. मात्र कंपनीचे अधिकारी योगेश शेट्टी यांनी अरेरावी करत मुजोरी केल्याचा आरोप सरपंच कुणाल पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर भाजपचे पदाधिकारी किरण पंडित, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील यांनी आपल्या अन्य साथीदारांना बोलावून गावकऱ्यांवर आणि आमच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेच्या जोरावर दादागिरी

भाजप आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांनी सत्ता, पोलीस आणि तलवारींच्या जोरावर दादागिरी सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. हल्ल्याची माहिती देण्यासाठी पागोटे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. याप्रसंगी सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच करिश्मा पाटील, सदस्य सतीश पाटील, मयुर पाटील, प्राजक्ता पाटील, सोनाली भोईर, सुनिता पाटील आणि ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, सेक्रेटरी प्रथम तांडेल, खजिनदार श्याम पाटील उपस्थित होते. न्याय्य हक्कासाठी प्रसंगी एल अॅण्ड टी कंपनीविरोधात आंदोलन छेडून न्यायालयात दाद मागू असा इशाराही या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.

“पागोटेमध्ये राजकीय वाद सुरू आहे. तलवारीचा पुरावा नसल्याने कलमे लावण्यात आली नाहीत.”

जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण.