लखनौमध्ये चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी खळबळ उडाली. विमानतळावर उशिरा पोहोचलेल्या एका प्रवाशाने एअरलाइन्स कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आणि एकच गोंधळ उडाला. त्या प्रवाशाला तात्काळ सीआयएसएफकडे सुपुर्द करण्यात आले. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या विमानालाही उशीर झाला. अखेर पोलिसांसमोर माफी मागितल्यानंतर प्रवाशाला इशारा देऊन सोडण्यात आले. शिवाय त्याच्याकडून लिखित माफीनामाही घेण्यात आला.
विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनुसार, हा प्रवासी पत्नी आणि मुलीसह इंडिगोच्या विमानाने दिल्लीला जात होता. दरम्यान काही कारणावरून झालेल्या वादात प्रवाशाने इंडिगो एअरलाइनच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तिथे उपस्थित एका अन्य कर्मचाऱ्याने सांगितले की, प्रवाशी लेट बोर्डिंग करण्यासाठी काऊंटरवर आला होता. त्यावर त्या कर्मचाऱ्याने त्याला प्रश्न विचारल्यावर प्रवासी संतापला आणि त्याने त्याच्यासोबत हुज्जत घातली. त्यानंतर राग अनावर होऊन त्याने कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्याने वाद वाढला आणि त्याठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली.
प्रवाशाच्या या वर्तणुकीमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला एअरपोर्ट चौकीकडे सोपविले. तिथे चार ते पाच तास दोन्ही बाजूने वाद झाला. त्या कर्मचाऱ्याच्यावतीने अन्य एअरलाइन्स कर्मचारीही त्याच्यासोबत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशाला ताकिद दिली आणि लिखित माफिनामा घेतला. त्यानंतर त्याला सोडण्यात आले.