लखनऊ एअरपोर्टवर टेकऑफदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड; सुदैवाने दुर्घटना टळली, डिंपल यादवसह 150 प्रवासी बचावले

उत्तर प्रदेशातील लखनऊ विमानतळावर सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. रविवारी दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवर थांबले. यावेळी वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान थांबवले. यामुळे 151 प्रवाशांचे प्राण वाचवले. यावेळी समाजवादी पक्षाचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव देखील या विमानात होत्या.

दिल्लीला जाणारे विमानाने सकाळी 11 वाजता धावपट्टीवर येताच उड्डानासाठी वेग पकडला, परंतु तरीही हवेत उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे धावपट्टी संपण्यापूर्वीच वैमानिकाने हुशारीने विमान थांबवले. या घटनेमुळे विमानातील प्रवासी घाबरले होते. मात्र वैमानिकाच्या हुशारीमुळे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. नंतर एअरलाइनने प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली.

सुरतहून दुबईला जाणाऱ्या विमानातही बिघाड

दरम्यान, अलिकडेच सुरतहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवावे लागले होते. विमानात 170 हून अधिक प्रवासी होते. ही आपत्कालीन लँडिंग नसून तांत्रिक समस्येमुळे आपत्कालील लँडिंग करावे लागले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इंडिगो एअरलाइन्सने तातडीने दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जेणेकरून सर्व प्रवासी दुबईतील त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचू शकतील. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा गैरसोय झाली नाही.