
पंजाबमधील लुधियानामध्ये एका आईस्क्रीममध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका मुलाने रस्त्यावरील विक्रेत्याकडून एक चोकोबार विकत घेतला होता. यामध्ये एक मृत पाल आढळली, मुख्य म्हणजे हे आइस्क्रीम मुलाने खाल्ले होते. यामुळे विषबाधा झाल्यामुळे, मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावरील विक्रेत्याकडून आईस्क्रीम खरेदी केल्यानंतर, त्यात एक मृत पाल दिसली होती. लुधियाना येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना न जुमानता, रस्त्यांवर आणि परिसरात निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री सर्रास सुरूच आहे. परिणामी, रस्त्यावरील गाडीतून खरेदी केलेल्या आईस्क्रीममधून एक पाल बाहेर पडली, यामुळे विभागातही खळबळ उडाली आहे.
लुधियानातील ग्यासपूर भागात ही घटना घडली आहे. गयासपूरच्या सुंदर नगरमध्ये, एका 7 वर्षांच्या मुलाने रस्त्यावरील विक्रेत्याकडून 20 रुपयांना आईस्क्रीम खरेदी केले होते. मुलाने 20 रुपयांना दोन चोको बार कुल्फी खरेदी केल्या. मुलाने आईस्क्रीम बाउलमध्ये टाकले आणि ते खाऊ लागला तेव्हा त्याला आईस्क्रीममध्ये एक मृत पाल दिसली. त्याने ताबडतोब ही पाल आजीला दाखवली, त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांनी मुलाला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात नेले आणि आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीला जागीच पकडले.
स्थानिक रहिवासी नरिंदर कुमार यांनी सांगितले की, मिल्क बेल नावाच्या गाडीत एक व्यक्ती आईस्क्रीम विकत होता. या विक्रेत्याकडून मुलाने आईस्क्रीम खरेदी केले होते. मुलाच्या आजीने सांगितले की, तिचा नातू घरी पोहोचताच आणि आईस्क्रीम खायला सुरुवात करताच, आतून एक मृत पाल बाहेर पडली. या पालीचा भाग मुलाच्या तोंडातही गेला. स्थानिक लोकांनी आईस्क्रीम विक्रेत्याला त्याच्या गाडीसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे आणि आरोग्य विभागाला माहिती दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिस पथक आईस्क्रीम विक्रेत्याचीही चौकशी करत आहे. मुलाला सध्या रुग्णालयामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमरजीत कौर यांनी सांगितले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि अन्न सुरक्षा शाखेची टीम आईस्क्रीमचे नमुने घेणार आहे.