‘धुरंधर 2’ च्या सेटवर जखमी अर्जुन रामपालवर उपचार करायला आले अन् डॉक्टर बनले थेट अभिनेते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लुधियाना येथील सरकारी आरोग्य सुविधेत कार्यरत असणारे डॉ. सनी अशोक यांच्यासाठी 8 जुलै 2025 हा दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या डोक्याला दुखापत झाली आणि तातडीची मदत म्हणून डॉ. अशोक यांना सेटवर बोलावण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर एका पाठलागाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. डॉक्टर जखमी अर्जुन रामपालवर उपचार करायला आले अन् थेट अभिनेते बनले.

डॉ. अशोक यांनी तातडीने उपचार करून अर्जुनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्यानंतर संपूर्ण क्रूने सुटकेचा निश्वास सोडला.  उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉ. अशोक यांनी अभिनेता रणवीर सिंगसोबत केवळ एक फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, रणवीरने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चक्क चित्रपटातच काम करण्याची ऑफर दिली. सुरुवातीला ही मस्करी वाटली असली तरी, केवळ तीन दिवसांतच डॉ. अशोक यांना शाहनेवाल विमानतळावरील एका दृश्यात अभिनयाची संधी मिळाली. दिग्दर्शक आदित्य धर यांनी रणवीरच्या कल्पनेला तातडीने होकार दिला आणि जखमी भारतीय वीराला म्हणजेच रणवीर सिंगला विमानातून उतरताना वैद्यकीय मदत देणाऱ्या डॉक्टरची भूमिका डॉ. अशोक यांनी लिलया पार पाडली. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्याच टेकमध्ये हा शॉट पूर्ण करून दिग्दर्शकांची पसंती मिळवली.

डॉ. अशोक यांच्या कुटुंबाचा बॉलिवूडशी जुना ऋणानुबंध आहे. त्यांचे वडील डॉ. देविंदर अशोक हे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मित्र होते. आता डॉ. सनी अशोक स्वतः मोठ्या पडद्यावर झळकल्याने पंजाबमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. ‘धुरंधर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला असून, अवघ्या सहा दिवसांत भारतीय बाजारात 575 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने 919 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल यांच्यासह आर. माधवन आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.