
अणुशास्त्रज्ञ आणि अभियंता डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. श्रीनिवासन यांनी हिंदुस्थानच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. अप्सरा अणुभट्टीच्या बांधकामापासून ते अणुऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेपर्यंत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. वयाच्या 95 व्या वर्षीही ते इतके फिट अॅण्ड फाईन होते की त्यांची या वर्षाच्या सुरुवातीला अणुऊर्जा आयोगाचे (AEC) सदस्य म्हणून पुन्हा त्यांची निवड करण्यात आली. मात्र मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1955 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अणुऊर्जा विभागात (DAE) आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 1978 मध्ये श्रीनिवासन अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी एईसीचेही नेतृत्व केले. श्रीनिवासन हे मेकॅनिकल अभियंता होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सर्व नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हिंदुस्थानच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ.एम.आर. श्रीनिवासन यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षा आणि वैज्ञानिक विकासातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांचा वारसा भावी अभियंते आणि शास्त्रज्ञांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.