
कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण संबोधल्यामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपमागे आणखी एक शुक्लकाष्ठ लागले आहे. आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी, हिंदुस्थानी सैन्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायावर नतमस्तक आहे, असे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदुस्थानी लष्कराचा अवमान करणाऱया भाजप नेत्यांच्या विधानावर विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून भाजपवर देशभरातून टीका होत आहे.
जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण सत्रात बोलताना देवडा यांची जीभ घसरली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो. संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक त्यांच्या पायावर नतमस्तक होत आहेत, असे विधान देवडा यांनी केले. चोहोबाजूंनी जोरदार टीका झाल्यानंतर देवडा यांनी काँग्रेस माझे विधान मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे, असा आरोप करत सारसारव केली. देशाच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रचंड काम केले आहे. यासाठी देशातील जनता हिंदुस्थानी सैन्यापुढे नतमस्तक आहे. ज्यांनी कट रचला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आपल्या विधानाचा अर्थ होता. काँग्रेस नैराश्यात असल्याने बोलत आहे, असा कांगावा देवडा यांनी केला.
विजय शाह प्रकरणी सुनावणी 19 मे रोजी
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मंत्री विजय शाह यांच्याविरोधातील याचिकेवर 19 मे रोजी सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन विजय शाह यांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी काळे कपडे परिधान करून राजभवनसमोर धरणे आंदोलन केले. पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढत जबरदस्तीने आमदारांना उचलून गाडीत काsंबले. त्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.
भाजप नेत्यांकडून सैन्याचा सतत अवमान लज्जास्पद ः प्रियंका गांधी
भाजपा नेत्यांकडून आपल्या सैन्याचा सातत्याने होणारा अवमान अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे, अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. देशातील सर्व नागरिकांना हिंदुस्थानी लष्कराच्या शौर्याचा अभिमान आहे; परंतु भाजपातील लोक लष्कराचा अवमान करत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भाजपा त्यांना वाचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत आहे, असे त्या म्हणाल्या.