इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट, संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट झाल्याने घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तिघांना वाचवण्यात यश आले आहे. घरातील सिलिंडरचा भडका उडाल्याने आग आणखी भडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिमर व्यवसायिक मनोज पुगलिया यांच्या घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला लावले होते. या चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट झाल्याने घराला आग लागली. घरामध्ये दहाहून अधिक सिलिंडरच्या टाक्या होत्या. या सिलिंडरचाही स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.

घराला इलेक्ट्रिक कुलूप होते, जे वीजपुरवठा खंडित झाल्याने उघडता येत नव्हते. यामुळे घरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्नीशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. अखेर अथक प्रयत्नांनी अग्नीशमन दलाने घरातील सदस्यांना बाहेर काढले. मात्र सहा जणांचा मृत्यू झाला होता. अन्य तिघांचा जीव वाचला आहे.