महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला दुबई येथून ताब्यात घेतले आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर ही कारवाई केली आहे.
सुत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, सौरभ याला आठवड्याभरात हिंदुस्थानात आणले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर ॲपच्या माध्यमातून 6 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महादेव ॲपचा मास्टरमाईंड सौरभ चंद्राकर याचे डी कंपनीशी (दाऊद इब्राहिम) संबंध असल्याचा आरोप आहे. महादेव ॲपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या ॲपबाबत ईडीमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
ईडीने आतापर्यंत याप्रकरणी जवळपास 12 जणांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले होते की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) महादेव ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांचा एक वर्षाहून अधिक काळ तपास करत आहेत.