
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या अमानुषपणालाही लाजवेल अशा पद्धतीने करण्यात आली. अगोदर त्यांचा गळा चिरण्यात आला. त्यानंतर रक्तवाहिन्या कापण्यात आल्या. महादेव मुंडे यांच्यावर तब्बल 16 वार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून ही अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली; परंतु पोलिसांच्या हाती मात्र वर्ष उलटून गेले तरी एकही मारेकरी लागला नाही!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हय़ातील गुंडगिरी, माफियागिरी, खंडणीखोरीचे विदारक चित्र जगासमोर आले. या हत्येपूर्वी परळीमध्ये व्यापारी महादेव मुंडे यांची जमिनीच्या तुकडय़ासाठी कराड गँगने अतिशय अमानुषपणे हत्या केली. परंतु त्या वेळी या प्रकरणातील आरोपींना राजकीय संरक्षण मिळाले. पोलिसांनीही हाताची घडी घालून तपास केला. त्यामुळे अद्यापपर्यंत एकही आरोपी गजाआड झालेला नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आक्रोश करूनही पोलिसांना पाझर फुटला नाही. वाल्मीक कराडचा एकेकाळचा साथीदार विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर याने या प्रकरणात वाल्मीक कराडचा थेट सहभाग असल्याचा आरोप केला. परंतु तरीही पोलिसांच्या नाकावरची माशी हलली नाही. गेल्या आठवडय़ात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तपासाला गती देण्याच्या मागणीसाठी विष घेतले. परंतु तपास इंचभरही पुढे सरकला नाही.
अगोदर रेकी केली, हालहाल केले… फेकून दिले
विजयसिंह बांगर याने आज पत्रकारांशी बोलताना महादेव मुंडे यांच्या हत्येचा थरार कथन केला. वाल्मीक कराडचा मुलगा श्री आणि त्याच्या टोळीने महादेव मुंडे यांची अगोदर रेकी केली. महादेव मुंडे घरी जात असताना त्यांना उचलण्यात आले. वीस मिनिटे मुंडे यांचे हालहाल करण्यात आले. गळा चिरूनही जीव जात नसल्यामुळे श्वासनलिका कापण्यात आली. त्यानंतरही तडफडत असलेल्या मुंडे यांची मान मोडण्यात आली. हे सर्व फोटोत स्पष्ट दिसत असल्याचे बांगर म्हणाले. या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीत एकही आयपीएस अधिकारी नसल्याचा आरोप त्यांनी केला.





























































