मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानंतर आचारसंहिता

1013

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ 13 सप्टेंबर रोजी नगर जिह्यातल्या अकोले येथून होणार आहे. नाशिकला 19 सप्टेंबर रोजी यात्रेचा  समारोप होईल. महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 20 सप्टेंबर रोजी लागू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिह्यातील गुरुकुंज मोझरी येथून महाजनादेश यात्रेची सुरुवात केली होती. या यात्रेचे दोन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. आधीच्या दोन टप्प्यांत महाजनादेश यात्रेचा राज्यातील 24 जिल्ह्यांतील 106 विधानसभा मतदारसंघांतून 2208 कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला आहे.

आता तिसरा टप्पा 13 सप्टेंबर रोजी अकोले येथून सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यांतील 60 विधानसभा मतदारसंघांतून 1,528 कि. मी. प्रवास करणार आहे. 19 सप्टेंबर रोजी नाशिक येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

आचारसंहिता 20 सप्टेंबरला? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 सप्टेंबर रोजी महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेला हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना- भाजपचे सरकार निवडून यावे यासाठी ते काही घोषणा करू शकतात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याबरोबरच मागील महिन्यात पुराचा तडाखा बसलेल्या सांगली, कोल्हापूरसाठी मदतीची घोषणा करू शकतात. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यासाठी सुमारे 6 हजार 700 कोटींची मागणी केली होती. केंद्र सरकारने कर्नाटक, केरळसाठी तातडीने मदत जाहीर केली होती, मात्र महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर केली नाही. त्यामुळे मोदी यावेळी याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या