‘महामुंबई अर्बन निधी’ ने घातला डोंबिवलीकरांना कोट्यवधींचा गंडा

‘महामुंबई अर्बन निधी’ या खासगी वित्तीय संस्थेने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून कार्यालये खोलली. मात्र आता या कार्यालयांना टाळे लागले आहेत. डोंबिवलीतील शाखेलाही टाळे ठोकून संचालक पसार झाले असून त्यांनी डोंबिवलीकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. कष्टाची कमाई बुडल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संचालक आणि मॅनेजरला अटक करण्याची मागणी केली आहे.

‘महामुंबई अर्बन निधी’ लिमिटेड या वित्तीय संस्थेचे कामोठे, पनवेल येथे मुख्य कार्यालय आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी 2 कोटी 12 लाखांचा गैरव्यवहार उघड झाला होता. याप्रकरणी संचालकांवर नवी मुंबई पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. ही बाब ताजी असताना आता डोंबिवलीतील ब्रँचलाही टाळे लागले आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. गोरगरीबांचे पैसे लुबाडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख शाम चौगले आणि असंघटित कामगार सेवाभावी संस्थेचे नाना गायसमुद्रे यांनी पोलिसांकडे केली आहे.

■ डोंबिवली पूर्व, रामनगर, नवरे प्लाझा येथे ‘महामुंबई अर्बन निधी’ची शाखा आहे

■ जादा गुंतवणुकीचे आमिष दाखवून फेरीवाले, घरेलू कामगार महिला, रिक्षाचालक यांच्याकडून ठेवी गोळा केल्या. मात्र काही दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.

■ मॅनेजर सागर डोंगरे याच्याकडे आनंद गुप्ता, महेश सुर्वे, शारदा सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, तेजस हिर्लेकर या गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

■ संचालक सागर रिकामे, मयूर पाटील, मंगेश जाधव यांनी मोबाईल बंद ठेवून पोबारा केला आहे.

फसवणुकीची जंत्री

दोन वर्षांपूर्वी सागर डोंगरे याने डोंबिवली पूर्व, रघुवीरनगर येथे श्रमसंपदा नावाची पतपेढी काढून 16 लाखांचा घोटाळा केला होता. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि आता ‘महामुंबई अर्बन निधी’ मध्ये त्याने फसवणूक केली आहे. डोंगरे आणि त्याच्यासोबत असलेले संचालक वेगवेगळ्या नावाने पतपेढी आणि गुंतवणूक योजना काढून लोकांना गंडा घालत आहेत.